मेळघाटातील ३६ गावांतील पाणीटंचाई संपणार; थांबणार भटकंती

By आदिवासी युवा


मेळघाटातील ३६ गावांतील पाणीटंचाई संपणार; थांबणार  भटकंती

चिखलदरा (जि. अमरावती) : तालुक्यातील 36 गावांमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला पाण्याची समस्या निर्माण होते. या गावातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी दहाहीदिशा भटकंती करावी लागते. मात्र आमदार राजकुमार पटेल यांच्या प्रयत्नाने आता गुरुत्वीय बलावर कार्य करणारी योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून टंचाईग्रस्त 36 गावांना पाणीपुरवठा होणार आहे.


चिखलदरा तालुक्यातील 36 गावांतील आदिवासी बांधव नदीनाले, विहिरी, तलाव सगळीकडे पाण्यासाठी वणवण भटकंती करतात. पिढ्यान् पिढ्या सोनापूर भागातील आदिवासी बांधव पिण्याच्या पाण्यासाठी लढा देत आहेत. येथील नागरिकांचा बराच वेळ पाणी भरण्यासाठी निघून जात असतो. या परिसरात 10 ते 15 गावांत दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो.


यावर शासनाचा लाखोंचा निधी खर्च होतो. परंतु तरीही आदिवासी बांधव तहानेने व्याकूळ राहतात. आता मात्र आमदारांच्या प्रयत्नाने बागलिंगा धरणावरून 15 गावांची व चंद्रभागा धरणावरून 21 गावांची गुरुत्वीय बलावर कार्य करणारी योजना तयार करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आता आदिवासी बांधवांना पाणी मिळून त्यांची भटकंती थांबणार आहे.


चंद्रभागा व बागलिंगा धरणावर योजना चंद्रभागा आणि बागलिंगा धरण येथून प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार केली आहे. पाणीपुरवठा प्राधिकरण मंडळ अमरावती यांच्याकडून कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मजीप्रा धारणीचे उपविभागीय अभियंता दीपेंद्र कोराटे यांनी दिली.



Post a Comment

0 Comments

झाले