By आदिवासी युवा
अकोला : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय सुरु झाल्यानंतर सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेले वसतिगृह मात्र अद्याप बंद आहेत. त्यामुळे वसतीगृह सुरु करण्यात यावे व पंडित दीनदयाल योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारी आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता.२५) प्रहार विद्यार्थी आघाडीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
यावेळी प्रहारचे अरविंद पाटील यांच्यासह इतर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेले वसतीगृह बंद ठेवण्यात आले होते, परंतु आता सर्वत्र निर्बंध शिथिल होत असून जिल्ह्याची वाटचाल निर्बंध मुक्तीकडे सुरू आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. एसटीच्या बस फेऱ्या सुद्धा वाढल्या आहेत.
त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये रोज येणे-जाणे करावे लागत आहे. परंतु असे असल्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृह बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, ही बाब लक्षात घेऊन आदिवासी वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रहार विद्यार्थी आघाडीच्या वतीने विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. २५) आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी आदिवासी वसतीगृह हे लवकरात लवकर सुरू करण्यात यावे व शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारी आर्थिक मदत अद्याप मिळाली नसल्याने त्याचे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर वाटप करण्यात यावे, अशी मागणीसुद्धा यावेळी विद्यार्थ्यांनी केली.
अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता लवकरच आदिवासी वसतिगृह सुरु करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प संचालक यांनी प्रहारच्या विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकारी, सदस्यांना दिले. त्यासोबतच विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रलंबित आर्थिक मदत सुद्धा देण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार