मेळघाटातील हजारो मजुरांचे रोजगाराच्या शोधत स्थलांतर

By आदिवासी युवा


मेळघाटातील हजारो मजुरांचे रोजगाराच्या  शोधत स्थलांतर



चिखलदरा : मेळघाटातील आदिवासी बांधवांचे रोजगाराच्या शोधात मेळघाटबाहेर स्थलांतर होत आहेत. रोज गाड्या भरून मजूर मेळघाटबाहेर कामासाठी जाताना दिसून येतात. याठिकाणी सध्या कोणतीच कामे मिळत नसल्याने व जगण्यासाठी काम आवश्यक असल्याने मेळघाटातील आदिवासी बांधव पोट भरण्यासाठी रोजगाराच्या शोधात मेळघाटबाहेर पडत आहेत.


त्यामुळे मेळघाटातील गावे आता रिकामी दिसत आहेत. मेळघाटात उतारावर जमीन असल्याने या जमिनीत पीक फार कमी प्रमाणात होते. त्यामुळे शेतीची कामे संपली आहेत. आदिवासी बांधवांच्या हाताला काम नाही. या भागात सध्या रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे शासनाची १०० दिवस काम देण्याची घोषणाही हवेतच विरली आहे. 


अशा परिस्थितीत स्थलांतराशिवाय पर्याय नसल्याने आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात स्थलांतर करीत आहेत. आजच्या घडीला चिखलदरा तालुक्यात ९५ हजार ३०९ मजुरांची नोंद आहे. ५७ हजार ९७९ इतके मजूर जॉबकार्डधारक आहेत. सद्यःस्थितीत विविध १६ यंत्रणेअंतर्गत ३१७ कामे सुरू झाली आहेत. त्यात फक्त एक हजार ४८४ मजुरांना काम देण्यात आले आहे. अशी शासनदरबारी नोंद आहे. मजूर कामावर गेल्यानंतर मुलांचे संगोपन, शिक्षण तसेच मुले व महिलांची सुरक्षितता, आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. 


त्यातूनच कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू असले प्रकार मेळघाटात सातत्याने घडत आहेत. मात्र, मूळ विषयाकडे अद्यापही गांभीर्याने लक्ष देण्यात येत नसल्याने, ही समस्या गंभीर झाल्याचे बोलल्या जात आहे.




Post a Comment

0 Comments

झाले