रस्त्यासाठी आदिवासी बांधवांचे रास्ता रोको आंदोलन

By आदिवासी युवा


रस्त्यासाठी आदिवासी बांधवांचे रास्ता रोको  आंदोलन

कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात असलेल्या आदिवासी वाड्यांना जाणारा रस्ता वन जमिनीमुळे रखडला असून, वर्षानुवर्षे रस्त्याची मागणी पूर्ण होत नसल्याने ६ आदिवासी वाड्यांमधील रहिवाशांनी नेरळ-माथेरान घाट रस्त्यातील वाहतूक अर्धा तास बंद पाडली.


जुम्मापट्टी धनगर वाड्यापासून बेकरेवाडी, आसलवाडी, नाण्याचा माळ आणि मन्या धनगरवाडा या आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता शासन करीत नाही. त्यामुळे स्थानिक आदिवासींनी श्रमदान करून आपल्या वाडीत पोहचण्यासाठी रस्ता तयार केला. मात्र हा रस्ता दरवर्षी पावसाळ्यात वाहून जातो आणि त्यामुळे रहिवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल होतात. 


त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते जैतू पारधी आणि गणेश पारधी यांनी रस्त्यासाठी आतापर्यंत ४ वेळा उपोषण केले आहे. मात्र प्रत्येकवेळी उपेक्षाच पदरी आल्यामुळे शनिवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आदिवासी महिलाही रस्त्यावर उतरून नृत्य आणि गाणी सादर करीत होते. आलेल्या पर्यटकांनी रास्ता रोकोबद्दल त्रागा न करता आदिवासी महिलांच्या गायन-नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. 


यावेळी आदिवासी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बुधाजी हिंदोळा, सरचिटणीस गणेश पारधी, उपाध्यक्ष भगवान भगत, विभागीय अध्यक्ष सुरेश दरवडा, बाळू पारधी, बुधाजी निरगुडे, बुधाजी पारधी, बाळू सांबरी, लक्ष्मण सांबरी, जोमा निरगुडे, सुनील पारधी आणि महिला उपस्थित होत्या. पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी आंदोलन थांबविण्याचे आवाहन करताना रस्ता तयार करण्यासाठी स्वतः शासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.




Post a Comment

0 Comments

झाले