"लखमापुर आदिवासी मजुर अत्याचार प्रकरणातील फिर्यादी आणि साक्षीदारांना पोलीस संरक्षण मिळावे, आदिवासी मित्र अमोल बच्छाव यांची विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे मागणी. "

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




नाशिक : लखमापुर (ता. बागलाण) येथिल आदिवासी मजुरांना बाहेरगावी मजुरीस प्रतिबंध करण्यासाठी येथिल काही लोकांनी ग्रामपंचायतीसमोर   मजुर महिला, लहान बालकांना अपमानास्पद वागणूक दिली होती. 

             

या संदर्भातील गुन्हा सटाणा पोलीस ठाण्यात नोंदविला असून फिर्यादी व साक्षीदारांवर गुन्हेगारांकडून दबाव, धाकदपटशा केला जाऊ नये ; तसेच फिर्यादींना निर्भयतेने आपल्या दैनंदिन आयुष्यात वावरता यावे यासाठी आदिवासी मित्र, जनसेवक, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ता प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी 'विशेष पोलीस महानिरिक्षक, नाशिक परिक्षेत्र' यांच्याकडे लखमापुर प्रकरणातील पीडित फिर्यादी आणि साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी लेखी स्वरुपात मागणी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक शहर पदाधिकारी दिलिप लिंगायत, रवी जाधव, बाबाजी केदारे आदी उपस्थित होते.

                  


लखमापुर येथिल कारगिल वस्तीवरील आदिवासी जमातीचे शेतमजुर, कामगार आपल्या उदरनिर्वाहाच्या कारणास्तव एका खाजगी वाहनाने प्रवास करत कामाच्या ठिकाणी जाणार असल्याची बातमी गुन्हेगारांना कळली असता त्यांनी त्या वाहनाला गावाच्या लगत असणाऱ्या एका रस्त्यावर अडविले. तिथे मजुरांच्या वाहन चालकाला दमबाजी करत ग्रामपंचायतीसमोर वाहन घेण्यास सांगीतले. दरम्यान ग्रामपंचायतीसमोर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली असता सर्वांसमक्ष विकृत मानसिकतेच्या लोकांनी आदिवासी मजुर महिला, लहान बालकांस अश्लाघ्य शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण केली.

     


           

या प्रकरणाने त्या दिवसापासून वातावरण तापले होते. त्याच दिवशी पीडितांनी सटाणा पोलीस ठाणे गाठले असता अनेक प्रयत्न करुनही गुन्हा दाखल झाला नाही. तरी पीडित फिर्यादी आपल्या मतावर ठाम असल्यामुळे तसेच ; आदिवासी संघटना, प्रसारमाध्यमं आक्रमक झाल्यानंतर शेवटी दि. २० डिसें. २०२१ रोजी सायंकाळी 'अनु.  जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम' १९८९ च्या सुधारित अधिनियमातील कलम ३(१)r , ३(१) s, ३(१) w (२), ३(२)(पाच), यांसह भा.दं.वि. मधिल ३९५ (दरोडा), भा.द.वी ३४१, १४३, ३२३, ५०४, ५०६ या कलमांतंर्गत एकुण दहा गुन्हेगारांविरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.


मात्र अद्याप दि. २४/१२/२०२१ पावेतो गुन्ह्यातील आरोपींना अटक झालेली नसून आरोपी मुक्तपणे संचार करीत, फिर्यादी आणि साक्षिदारांवर प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरित्या दडपण व धाकदपटशा करण्याचे प्रकार चालले आहे. यामुळे पीडित धास्तावले असल्याने आरोपींना तात्काळ अटक होऊन, पीडितांना न्याय व निर्भय जीविताच्या हमीसाठी संरक्षणाची नितांत आवश्यता आहे. यासाठी विशेष पोलीस महानिरिक्षकांसमोर हा विषय मांडण्यात आल्याचे अमोल बच्छाव यांनी सांगीतले.






Post a Comment

0 Comments

झाले