इथल्या हिंस्र वर्ण - जाती व्यवस्थेने ज्याचा संस्थात्मक खून केला त्या रोहित वेमुलाचा आज शहादत दिवस.....

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




✒️डॉ.संजय दाभाडे सर  , पुणे 9823529505  Dr. Sanjay Dabhade Sir 

♦️ Rohit Vemula , Rest in Power.... 

🔹 १७ जानेवारी २०२२. 


१७ जानेवारी २०१६ रोजी रोहित वेंमुला चां बळी घेण्यात आला. आज त्यास तब्बल ६ वर्षे होऊन गेलीत....


अश्याच प्रकारे भारतीय शिक्षण क्षेत्रात वर्ण - जाती व्यवस्थेने अनेक दलित आदिवासी , मागास वर्गीय होतकरू विद्यार्थ्यांचे बळी घेतले, मानसिक नी शारीरिक खच्चीकरण केले. विशेषता तथाकथित दर्जेदार शिक्षण संस्थांमध्ये तर उच्च जातीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी मागास वर्गीय विद्यार्थ्यांचे  छळ केले आहेत....मेरीट च्या नावाखाली रॅगिंग केली आहे. 


आजही असे अनेक संस्थांच्यात सुरू आहे. अर्थात हे सुद्धा महत्वाचे आहे की मागास वर्गीय विद्यार्थ्यांनी हे अन्याय निमूटपणे सहन केले नाहीत व त्याविरुद्ध आवाज देखील बुलंद केले आहेत. मी स्वतः अश्याच प्रकारे संघर्ष करत चळवळीत दाखल झालो.


बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे हे असच पेशवाई असणारे कॉलेज होते.  परंतु आमच्या आधीच्या पिढीने तिथं डॉ.आंबेडकर मेडीकोज असोसिएशन ( DAMA ) स्थापन करून आम्हाला लढण्याचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला होता. तो आम्ही वापरला नी लढत राहिलो. 

हेच आमचं चळवळीचे विद्यापीठ ठरलं.....!


आज बी.जे. त परिस्थिती बदलली आहे.....ब्राम्हणशाही बिळात गेलीय .....बहुजन टीचर्स मोठ्या संख्येनं आहेत नी खुद्द डीन ( अधिष्ठाता ) आंबेडकरी आहेत.


आरक्षण धोरणा मुळे हे चित्र आता दिसत आहे, परंतु अजूनही आयआयटी, एम्स ह्या काही उच्च शिक्षण संस्था मध्ये व मुंबईच्या के. ई.एम. , कूपर, नायर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल्स मध्ये पेशवाई सुरू आहे व डॉ.पायल तडवी ह्या आदिवासी तरुणीचा बळी तिथं घेण्यात आला होता. अलीकडे देखील एका दलित विद्यार्थ्याचा छळ तिथं केला गेला.


युजीसी च्या गाईडलाईंस नुसार प्रत्येक उच्च शिक्षण संस्था व विद्यापीठात ' समान संधी केंद्र ' Equal Opportunity Centre असणं आवश्यक असताना त्यांची अंमलबावणीबाबत सर्वत्र वाईट परिस्थिती आहे. अश्या परिस्थितीत आंबेडकरी व आदिवासी चळवळींनी घटना घडू नयेत ह्यासाठी महाविद्यालयांत संघटन उभे करणे अधिक महत्वाचे आहे.


रोहित कायदा करून घेण्यात आपण अपयशी ठरलो आहोत....दलित आदिवासी लोकप्रतिनिधी बिनकामाचे नी निरुपयोगी ठरत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर सामाजिक चळवळीवर मोठी जबाबदारी आहे.


सर्वोच्च  न्यायालयातील वकील  ऍडव्होकेट दिशा वाडेकर ह्यांनी रोहित वेमुलाच्या आई राधिकाताई  वेमुला व डॉ.पायल तडवी ह्यांच्या आईं आबेदा ताई ह्यांच्या वतीने  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च शिक्षण संस्था मधील जातीयवाद रोखण्यासाठी गाईडलाइन्स ची मागणी केली आहे. ( रेगिंग बद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईड लाइन्स च्या धर्तीवर ).


कॅम्पस मधील वर्ण जाती वर्चस्वाला आव्हान देत शिक्षण क्षेत्रात समतेचे , न्यायाचे वातावरण तयार करणे हेच आजच्या दिनी रोहित वेमुलास खरे अभिवादन ठरेल....!



♦️ डॉ.संजय दाभाडे , पुणे 

9823529505 sanjayaadim@gmail.com

Post a Comment

0 Comments

झाले