"जागतिकीकरणोत्तर काळातील सामाजिक क्रांती घडवून आणणारे भारतीय लोकशाहीतील एकमेव नाव म्हणजे आदरणीय प्रकाश आंबेडकर !"

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)



एकही हिंसक शस्र हाती न घेता न्याय्यपूर्ण वातावरणात समतेवर आधारीत बंधुभाव निर्माण करुन करोडोंच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडविणे म्हणजे सामाजिक क्रांती होय'.

जागतिकीकरणोत्तर भारताच्या समाजात आधुनिक लोकशाही राज्यामध्ये या क्रांतीस कारणीभुत ठरु शकणारे एकमेव नाव म्हणजे आदरणीय प्रकाश आंंबेडकर होय.

 ✒ प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव. 9158414068   

प्रा. अमोल बच्छाव सर 








भारताच्या स्वातंत्र्यांनंतर संविधानाला अपेक्षित असणारी सामाजिक लोकशाही रुजविण्यासाठी गेली सत्तर वर्षे  सत्तेच्या सिंहासनाधिश्वरांकडे अतिशय आशाळभूतपणे बघत-बघत लोटली. पण जो समाज आजपर्यंत गावकुसाबाहेर होता तो राजकीय सत्तापदांच्या परीघाबाहेरही होता. 


ना- इलाजास्तव का होईना नव्वदीनंतर हे चित्र जागतिकीकरण आणि ७३-७४ व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठिकाणी बदलायला सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही पण या बदलाने सन्मान आणि पदायोग्य प्रतिष्ठा दिली का ? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच मिळेल. आणि हे उत्तर मिळवायचे असेल तर कोणीही सहज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही आस्थापणेत जावून पहावे की तिथे निवडून आलेल्या अनु. जमाती, अनु. जाती, महिला या सरपंच, सभापती हे खरच त्यांच्या पदाच्या खुर्चीवर असतात का, बसू दिलेच तर त्यांना त्यांच्या विचारांनुसार निर्णय घेऊ दिले जातात काय ? इतकेच काय 'स्वातंत्र्य दिन', 'प्रजासत्ताक दिना'च्या दिवशी या घटकांना त्यांचा अधिकार असतानाही कित्येक ठिकाणी ध्वजारोहणही करु दिले जात नाही यावर आजपर्यंत कुणाचीही नजर गेली नसेल काय? 


यावरुन लक्षात येते की स्वातंत्र्योत्तर काळात सत्तर वर्षांनंतरही संपूर्ण बहुजन घटक म्हणजे जो गावगाड्याचा महत्वाचा भाग म्हणून तो  सुतार, कुंभार, न्हावी, तेली, माळी, कणबी,कोळी,  साळी, आदिवासी, धनगर, महार मांग, चांभार, मुसलमान हा घटक असूनही सामाजिक लोकशाहीपासून वंचित राहिला आहे. 


जागतिकीकरणाच्या काळात हा घटक थेट जगाच्या भावभावनांशी जोडला गेला, तो जगाशी संवाद करु लागला वेगवेगळ्या माध्यमातून दोन पैसे कमवू लागला त्यांतूनच तो मॉल-मल्टिप्लेक्स-मल्टीमिडीया संस्कृतीत रमू लागला या खोट्या स्वातंत्र्यात तो त्याचे स्वत:चे देशातील राजकीय लोकशाहीतील प्रतिनिधित्वाचे भान हरपून बसला आणि सामाजिक लोकशाहीतून परागंदा झाला.


ज्या समुहाचे राजकीय प्रतिनिधित्व नाही तो कितीही खोट्या स्वातंत्र्यात रमला तरी त्याचे अस्तित्व देशाच्या नकाशात शुन्य असते हे पहिल्यांदा या देशात कोणी ओळखले असेल तर प्रकाश आंबेडकर या महान समाज धुरिणाने.


त्यांनी ओळखले समाजातील सर्व लहान मोठ्या समुहांना संसदीय लोकशाहीच्या प्रक्रीयेत जोपर्यंत सामावून घेत नाहीत तो पर्यंत या देशातील राजकीय-सामाजिक क्रांतीचे चक्र गतीमान होणे शक्य नाही. म्हणून त्यांनी सर्व संख्येने कमी छोट्या-छोट्या समुहांना या प्रक्रीयेत सामावून घेण्याचा पहिला प्रयत्न केला. 




विशाल समुद्रामध्ये छोट्या शिंपल्यांचे अस्तित्व जसे हरपले जाते, पण त्यातही मोती सापडतात आणि ते मोती त्या समुद्राची शान वाढवितात अशाप्रकारे भारतासाख्या विशाल जनसागरातून काठाला बसून या मोतींना पारखण्याचे महान कार्य प्रकाश आंबेडकरांनी केले, आणि आजपर्यंत कुणाच्या खिजगणतीत नसलेल्या त्या मोत्यांना म्हणजेच लहान-लहान जातीसमुहांना सोन्यापेक्षाही जास्त लाखमोलाचे महत्व मिळवून दिले.




आज सत्तर वर्षात ज्या जातीसमुहांना संसदेची साधी पायरीही बघता आली नाही अशा या जातीसमुहांना आता थेट संसदेच्या बाकावर बसविण्याचे ध्येय प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समोर ठेवले आहे.


या ध्येयाला सर्वच स्तरातून, जातीसमुहातून प्रचंड बळ प्रदान करण्यात येत आहे. आपण प्रत्येकाने या सामाजिक क्रांतीच्या इतिहासाने अग्रणी साक्षीदार व्हावे असा हा क्षण आहे.


दिल्ली खुप जवळ आहे हेच याप्रसंगी म्हणणे संयुक्तिक ठरेल !


       ✒ प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव. 9158414068

Post a Comment

0 Comments

झाले