आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
नंदुरबार दि.२७ प्रतिनिधी ) नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना जिल्हा निर्मितीनंतर पहिल्यांदाच निवड श्रेणी मंजूर करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत २१०६ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी मंजूर असल्याने निवड श्रेणीसाठी मंजूर करावयाची संख्या २०% च्या प्रमाणात एकूण ४२१ निर्धारित करण्यात आली होती.
यात २४ वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण असलेल्या शिक्षकांची संख्या ११३८ असून निवडश्रेणीसाठी ८७३ शिक्षकांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी पदवी / पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेल्या शिक्षकांची संख्या ७३८ होती. या ७३८ शिक्षकांपैकी निवडश्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांची संख्या १३० असल्याने निवडश्रेणी समितीच्या विचारार्थ ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांची निवडश्रेणी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, समितीचे सदस्यसचिव तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम आणि समिती सदस्य तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांनी छाननी व तपासणी केल्यानंतर या १३० शिक्षकांना समितीमार्फत निवडश्रेणी मंजूर करण्यात आली आहे.
निवडश्रेणी मंजूर व्हावी म्हणून प्राथमिक शिक्षक संघटनांनी वेळोवेळी मागणी व पाठपुरावा केलेला होता. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी शिक्षण विभागाला निर्देश देऊन निवड श्रेणी मंजूरीची प्रक्रिया सुरु केली होती. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांची याकामी समन्वयक म्हणून देखील नेमणूक करण्यात आली होती.
निवडश्रेणी मंजूर करण्याच्या प्रक्रियेत विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर, कनिष्ठ सहाय्यक सुनिल गिरी, तंत्रस्नेही शिक्षक नितीन शिनकर तसेच सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी आणि आस्थापना लिपीक यांनी परिश्रम घेतले आहेत.
जिल्हा निर्मिती नंतर पहिल्यांदाच प्रहार व शिक्षकेत्तर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत सर, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांची मागणी व जिल्ह्यातील विविध संघटनाच्या पाठपुराव्यानुसार शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर केली आहे.
या निवडश्रेणी मंजूर आदेशाचे स्वागत जिल्ह्यातील वाडी-वस्ती पाड्यावरील शिक्षक बंधू भगिनी यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे व शिक्षकांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार