आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
गडचिरोली : एखाद्याच्या अंगी असलेल्या कलेचा सदुपयोग करून त्यातून जोपासलेला छंद कायम टिकेलच असे नाही. त्यामुळे अनेकांचे कलागुण विकसित होण्याआधीच दबले जातात. परंतू गडचिरोली तालुक्यातल्या मौशीखांब येथील अमोल उंदीरवाडे या कलावंत युवकाने आपला छंद जोपासत आता त्यालाच आपल्या जीवनाचा आधार बनविले आहे.
गडचिरोलीपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मौशीखांबमधील अमोल उंदीरवाडे हा युवक १६ वर्षांपासून काष्ठशिल्प तयार करून त्याचे विविध ठिकाणी प्रदर्शन मांडत आहे. सध्या गडचिरोलीतील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणात सुरु असलेल्या कृषी प्रदर्शनातही त्याने राणी महिला बचत गटाच्या वतीने आपल्या काष्ठशिल्पांचे प्रदर्शन मांडले आहे.
जंगलातील टाकाऊ लाकडांपासून काहीतरी टिकाऊ आणि लक्षवेधक बनविणाऱ्या अमोलने बनविलेले विविध पक्षी, झाड, हरिण, तलवार, स्टँड, टी-टेबल अशा वस्तूंनी दिल्ली, मुंबई, पुणे अशा शहरांसह गोव्यातही अनेक कलाप्रेमींना भुरळ घातली आहे.
काष्ठशिल्पातून येणारी मिळकत अल्प असली तरी छंद जोपासताना मिळणारे समाधान जास्त महत्वाचे असल्याचे तो सांगतो. विशेष म्हणजे हा गुण आपल्यापुरता मर्यादित न ठेवता जवळपास ४० युवकांना काष्ठशिल्पकृती तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले आहे.
सामाजिक जाणीवेतून तो आपल्या पैशाने रंग विकत घेऊन गावातील ठळक ठिकाणी, शाळांमध्ये जाऊन सुविचार लिहीतो.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार