शाळा सकाळ सत्रात पुर्वरत सुरू ठेवाव्यात प्रहार शिक्षक संघटनेची मागणी

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Schools-should-resume-in-the-morning-session



✍️गोपाल गावित सर, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना 

गोपाल गावित सर







नंदुरबार दि.२९ (प्रतिनिधी) शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा संपूर्ण क्षमतेने शंभर टक्के उपस्थितीसह सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यात शनिवारी पूर्णवेळ आणि रविवारी ऐच्छिक स्वरुपात शाळा सुरू ठेवता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, उन्हाळ्यातील वाढते उष्णतामान, प्रचंड उकाडा व शाळेतील असुविधा लक्षात घेता या आदेशाबाबत फेरविचार करावा अशी मागणी नंदुरबार जिल्हा प्राथमिक प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, प्राथमिक  शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्याकडे लेखी निवेदन ई-मेलद्वारे करण्यात आले आहे. 


कोरोना काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पहिली ते आठवी वर्ग एप्रिल महिन्यात पूर्णवेळ सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. परंतु कोरोना काळात शिक्षकांनी प्रतिबंधात्मक कर्तव्य पार पाडत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे जबाबदारीने लक्ष दिले आहे. स्वतः हून अनेकविध उपक्रमांच्या आधारे शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या नेतृत्वाखाली पारावरची शाळा, या उपक्रमांद्वारे जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे. 


शाळेतील असुविधा, भारनियमन व खंडीत विद्युत पुरवठा यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना उष्णताघाताचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रचंड उकाड्याच्या विपरीत परिस्थितीमुळे जीव कासावीस करणारे वातावरण असते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दिवसभर शाळा सुरू ठेवणे योग्य ठरणारे नाही . त्यामुळे सकाळच्या सत्रात शाळांची वेळ कायम ठेवावी अशी मागणी शिक्षक प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.



Post a Comment

0 Comments

झाले