आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
लाखनीमध्ये 1821 मध्ये इंग्रजी महिलेच्या घडलेल्या घटनेची व कबरीची माहिती केली सर्वाना अवगत
✍️एसके जी पंधरे- विदर्भ ब्युरो चिफ, महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ
लाखनी:- ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने 15 मार्च 1821 ला घडलेली घटना सर्वाना माहीत व्हावी म्हणून शहरात लागून असलेल्या मुरमाडी गावातील इंग्लंडमध्ये जन्मलेल्या पण लाखनी येथे 15 मार्च 1821ला ब्रिटिशांच्या कॅम्प मध्ये आकस्मिक मृत्यु झालेल्या महिलेची कबर आहे. या ऐतिहासिक थडग्याला ग्रीनफ्रेंड्स चे सदस्य विद्यार्थी व पदाधिकारी यांनी एकत्रित भेट दिली व मनमिळावू ,सात्त्विक प्रवृत्तीच्या ह्या मिस्ट्रेस वॉटसन नामक महिलेला मूक आदरांजली अर्पण केली.
याप्रसंगी कबरीजवळ माहिती देताना ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी सांगितले की ब्रिटिश सरकारमध्ये सैन्यात 22व्या रेजिमेंटच्या सेकंड बटालियनचे कंमाडिंग ऑफीसर तसेच सार्वजनिक वाहतुकीत रोड बिल्डिंग ऑफिसर असलेले मेजर मिस्टर कॅलये वॉटसन व त्यांची पत्नी मिस्ट्रेस वॉटसन सैनिकांच्या लवाजम्यासह रायपूरहून नागपूरला जात असताना लाखनी मुक्कामी त्यांचा कॅम्प त्यावेळच्या समर्थ ग्राऊंडवर थांबला होता.परंतु वादळी वातावरणामुळे तसेच प्रवासाच्या दगदगीमुळे त्यांच्या पत्नीची तब्येत कॅम्प मध्ये बिघडली व लाखनी कॅम्प मध्ये त्यांचे अनेक दिवस उपचार चालले परंतु तीव्र आजारामुळे त्यांची पत्नी त्याच कॅम्पमध्ये अनेक दिवसाच्या उपचारानंतर दगावली. शेवटी तिचे दफन मुरमाडी येथे 15 मार्च 1821ला करण्यात आले.कालांतराने या दफनभूमीवर छोटेसे देवळासारखी दिसणारी कबर अर्थात समाधीस्थळ तयार करण्यात आले.त्यावेळी कबरीच्या बाजूने मुरमाडी गावच्या फक्त तलावाचे अस्तित्व होते व आजूबाजूची जागा निर्जन पडिक जागेसारखी होती. जुन्या मुरमाडी गावातील काही घरांची वस्ती या ठिकाणापासून दूर होती.या मिस्ट्रेस वॉटसनच्या समाधीस्थळाची नोंद इतर कबरीप्रमाणे ब्रिटिश गॅझेट व ब्रिटिशांच्या एशियाटिक जर्नल मध्ये घेण्यात आली.त्यानंतर 25- 30 वर्षानंतर स्थानिक लोक त्या वास्तूची मुळ घटना विसरून तलावाशेजारी पडिक निर्जन जागी असलेली एखादी देवळासारखी पवित्र वस्तू समजुन स्थानिक लोक पूजा अर्चना करून फुले व्हायला लागले तसेच विशेषतः स्थानिक स्त्रिया त्या वास्तूच्या काही भागात असलेला गेरूचा रंग कपाळी लावायला लागले.पुढे ही घटना घडल्यानंतर 60 वर्षांनी जागतिक किर्तीचे थोर ब्रिटिश इतिहास संशोधक व गाजलेले पुरातत्व संशोधक सर अलेक्झांडर कनिंगहम यांनी त्या काळात भारतातील अनेक ऐतिहासिक स्थळांचा पद्धतशीर शास्त्रीय सखोल अभ्यास तसेच उत्खननाद्वारे करून भारताच्या अनेक स्थळांचा 3000 वर्षे जुना इतिहास शोधून काढला.हेच सर अलेक्झांडर कंनिंगहम इ.स. 1881-82 ला जेव्हा त्यावेळच्या मध्यप्रांताचा दौरा करायला आले असता व त्यादरम्यान लाखनीला थांबले असता त्यांना या ब्रिटीश महिलेच्या कबरीची माहिती काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिली.त्यांनी यादौऱ्यामध्ये वेळात वेळ काढुन या पवित्र स्थळाला दुसऱ्या दिवशी भेट दिली व सविस्तर माहिती गोळा केली.त्याप्रमाणे त्यांनी आपल्या डायरीत नोंद घेतली.त्यांनी त्या वास्तूचे वय त्यावेळी 1881-82 ला 20 ते 25 वर्षें जुने काढले. तसेच त्यांना यावेळी स्थानिक लोक या समाधीस्थळाची हिंदू पद्धतीने पूजा अर्चना करतात व त्या वास्तूवर पवित्र तिलक सुद्धा काढलेले आहे असे निरीक्षण नोंदविले.ही घटना त्यांनी आपल्या 'मध्यप्रांतातील दौरा' या पुस्तकात लिहून ठेवली. पण पुढे ब्रिटिशांच्या गॅझेट 'एशियाटिक जर्नल' या भारतातील थडगे, कबरी व प्रवासी ब्रिटीश नागरिक यांचे प्रवासवास्तव्य तसेच ऐतिहासिक स्थळांची वर्षानुसार सविस्तर नोंद घेणाऱ्या जर्नल मधील सातव्या खंडात इ.स. 1821 ची घटना संक्षिप्त शब्दात लिहून ठेवल्याने या कबरीचा उलगडा कालांतराने सर्वाना झाला व ही घटना त्याही पूर्वीची म्हणजे 15 मार्च 1821ची आहे अशीही माहिती त्यांनी पुरविली.हे स्थळ आता भरवस्तीत आले असून मुरमाडी गावाच्या मुख्य रस्त्याला लागून आहे.अजूनही 15 फूट उंच असलेली ही वास्तू बऱ्यापैकी अवस्थेत असली तरी वरच्या बाजूला झाडेझुडपे वाढल्याने ते खचत आहेत .त्यामुळे पुरातत्व संशोधक विभागाने तसेच स्थानिक ग्रामपंचायतीने लक्ष देऊन निगा राखावी तसेच त्या ठिकाणी विस्तृत माहितीदर्शक फलक लावावा व या स्थळाला 'हेरीटेज दर्जा' द्यावा अशी मागणी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने केली आहे.ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या या "201 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक घटनेला उजाळा" देण्याच्या उपक्रमाला नेफडो जिल्हा शाखा भंडारा तसेच अ.भा. अंधश्रध्दा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी जिल्हा शाखा भंडारा यांचे सुद्धा सहकार्य लाभले.
बरोबर 15 मार्च 1821 अर्थात 201 वर्षापूर्वी घडलेल्या या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्याकरिता ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी अशोक वैद्य,दिनकर कालेजवार, प्रा. अशोक गायधने,दिलीप भैसारे,योगेश वंजारी, ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर ,मारोतराव कावळे , मुरमाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच अल्का चोले तसेच परिसरातील रहिवासी व राणी लक्ष्मी कन्या विद्यालय लाखनी आणि सिद्धार्थ विद्यालय सावरीच्या अनेक विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक कबरीला भेट देऊन प्रा. गायधने सरांनी 'डिस्कवरी ऑफ भंडारा' च्या पेज वरून संकलित केलेल्या माहितीला अवगत करून घेतले.यावेळी ब्रिटिशांच्या 'एशियाटिक जर्नल' या गॅझेटद्वारा त्या महिलेची माहिती व फोटो 201 वर्षापुर्वी सुद्धा जपून ठेवणे याबद्दल उपस्थित सर्वांनी ब्रिटिशांच्या या माहिती संग्राह्य वृत्ती व जपवणूकवृती बद्दल कौतुक केले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार