आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
लाखनी नगरपंचायत चे 'ब्रँड अँबेसेडर' म्हणून नुकतीच नियुक्ती
'लोकमित्र सरदार' पुरस्काराने सुद्धा सन्मानित
लाखनी:- ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी व साकोली येथील कार्यवाह प्रा.अशोक गायधने हे मागील 22 वर्षांपासुन अविरतपणे निसर्ग व पर्यावरण संवर्धनाचे प्रत्यक्ष नाविन्यपूर्ण व अभिनव कार्य भंडारा- गोंदिया सातत्याने करीत असून त्याद्वारे त्यांनी अनेक पक्षीमित्र, खगोलमित्र,सर्पमित्र, वृक्षमित्र,फुलपाखरूमित्र तयार करून निसर्गसंवर्धनाचे कार्य करीत आहेत त्याचबरोबर होतकरु निसर्गप्रेमी तरुणांना, विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाद्वारे प्रेरणा देण्याचे कार्य सुद्धा ते अविरतपणे करीत आहेत.सोबतच लाखनी शहरात 'नेचर पार्क' उभारण्याचे प्रत्यक्ष कार्य त्यांनी सुरू केले आहे .अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन जिल्हा भंडाराचे जिल्हा कार्याध्यक्ष या नात्याने त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन,भंडाफोड ,वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे,खगोलविज्ञान क्षेत्रात केलेले अविरत कार्य या सर्व कार्याची दखल घेऊन 'नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था' ह्या राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या पर्यावरण संस्था तर्फे पुणे येथे नुकताच 'राज्यस्तरीय निसर्गमित्र पुरस्कार' सिने अभिनेते जयराज नायर, आय.एफ.एस. व महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डचे चेअरमन डॉ. एस. एच. पाटील,महाराष्ट्र राज्य वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे,पिंपरी चिंचवडचे महापौर उषा(माई) ढोरे या प्रमुख अतिथींच्या हस्ते तसेच नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्थांचे राष्ट्रीय पदाधिकारी यांचे हस्ते पुणे येथील अंकुशराव लांडगे सभागृहात आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनात प्रा.अशोक गायधने यांना 'राज्यस्तरीय निसर्गमित्र पुरस्कार' प्रदान करण्यात आला. कोरोनामुळे मागील दोन वर्षात तीनदा स्थगित करण्यात आलेला हा कार्यक्रम यावर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे कोरोनाचे सामाजिक सुरक्षितता अंतर पाळून 'राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन' आयोजित करण्यात आले.
लाखनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांनी प्रा. अशोक गायधने यांनी केलेल्या विविध प्रत्यक्ष कार्याची दखल घेऊन लाखनी नगरपंचायत स्वच्छता अभियानाचे 'प्रथम ब्रँड अँबेसेडर' म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन लाखनी नगर पंचायत अध्यक्षा त्रिवेणी पोहरकर, नगरसेवक राजेश निंबेकर, नगरसेवक महेश आकरे,नगरसेवक धनु व्यास, मनोज पोहरकर तसेच बांधकाम अभियंता संजय इंगोले यांनी व इतर नवनियुक्त नगरसेवक तसेच लाखनी नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारीवर्गानी त्यांचे अभिनंदन केले आहे.
लोकमित्र सरदार प्रतिष्ठान गोरेगाव तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला तर्फे भंडारा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये खगोलविज्ञान,स्पेस टेकनॉलॉजी, सॅटेलाइट मिशन तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणे,सूक्ष्म उपग्रह सोडून जागतिक विक्रम,आशियायी विक्रम,भारतीय विक्रम तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये भंडारा जिल्हा व लाखनी तालुक्यातील विद्यार्थी सहभागी करणे तसेच निसर्ग संवर्धन,अंधश्रद्धा निर्मूलन आदी कार्यात भरघोस कार्य केल्याबद्दल 'लोकमित्र सरदार पुरस्कार' व 'डॉ.आंबेडकर भूषण पुरस्कार' नुकताच त्यांना लोकमित्र सरदार गुरुजी व से.नि.,प्राध्यापिका वासंती सरदार यांच्या हस्ते लोकमित्र प्रतिष्ठाण तर्फे त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अथर्व गायधने,पूर्वा गिर्हेपुंजे,वैभव मस्के,छविल रामटेके,अर्णव गायधने यांनी जागतिक विक्रम,आशियायी विक्रम,भारतीय विक्रम केल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार लोकमित्र सरदार गुरुजी,वासंती सरदार यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
यापूर्वीही प्रा.अशोक गायधने सरांना शामराव बापू प्रतिष्ठान साकोली व राष्ट्रवादी काँग्रेस,शेप व 'मदत' तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार,सामाजिक वनीकरण तर्फे 'आदर्श पर्यावरण शिक्षक पुरस्कार' , टेरी पुणे तर्फे 'प्रकाशाचे बेट' पुरस्कार,स्वप्नपूर्ती लाखनीतर्फे 'मोती सन्मान पुरस्कार' इत्यादी अनेक पुरस्कारासोबत आपल्या अविरत कार्याने कटकवार विद्यालय साकोलीला 'राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार' तसेच दोनदा 'पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार' प्राप्त करून दिला आहे. ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य, पदाधिकारी दिनकर कालेजवार,दिलीप भैसारे, पंकज भिवगडे, नाना वाघाये,योगेश वंजारी ,मंगल खांडेकर यांच्यासमवेत सर्व निसर्गप्रेमी नागरिक ,निसर्गप्रेमी विद्यार्थी,अभाअंनिसचे तसेच नेफडोचे जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार