नंदुरबार दि.२८ (रयतेचा कैवारी प्रतिनिधी ऑनलाइन वृत्तसेवा) जि.प.शाळा वरुळ ता.जि.नंदुरबार. शिंदे केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश भगवान वानखेडे यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांचा वनभोजनाचा व निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख मंगु भील, सदस्य राजू भील तर प्रमुख पाहुणे म्हणून वरुळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अरुण सोनवणे, जिजामाता बी.एड कॉलेज नंदुरबारचे प्राचार्य डॉ. संजय शिंदे व प्राध्यापक भदाणे सर हे उपस्थित होते. शाळेपासून काही अंतरावर गावातील शिक्षणप्रेमी तीरसिंग दादा यांच्या निसर्गरम्य अशा शेतातील वडाच्या मोठ्या झाडाखाली वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला शिंदे केंद्रातील शिक्षक उमेश बेडसे लोणखेडा केंद्रातील शिक्षक आविनाश शामराव डोंगरे, शिवशंकर बालाजीराव देशमुख व पांडुरंग निवृत्ती निळे यांची उपस्थिति होती. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी इयत्ता तिसरी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी खास शाळेतील उपलब्ध फुले व पाने यांचे बुके बनवून त्यांना भेट दिली. इयत्ता चौथीचे विद्यार्थी आपल्या मनोगतामध्ये आपल्या शाळेबद्दल आपुलकी, शाळेमध्ये राबवलेले विविध उपक्रम, शाळेबद्दल वाटणारा त्यांना आनंद हे सर्व सांगत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना मोकळ्या करत असताना भावनिक झालेले दिसून आले. विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, दोरी उड्या अशा विविध प्रकारच्या खेळाचा आस्वाद मुले घेत होती. नंतर सर्वजण एकत्र बसून व्हेज-नॉनव्हेज पुलावाचा आस्वाद घेतला. यावेळी उमेश बेडसे सरांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांसाठी बिस्कीटपुडे वाटप केले. मुलांना कोका-कोला हे थंडपेय देण्यात आले. वरील सर्व कार्यक्रमाच्या सांगता समारंभाच्या वेळी प्राचार्य शिंदे सरांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल माळी व आभार शिक्षक दयानंद जाधव यांनी मानले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार