बामसेफ व सहयोगी संघटनांतर्फे भारतीय संविधान कार्यान्वयन चेतना व मूलनिवासी बहुजन एकता रॅली व प्रबोधन सभा




गोपाल गावित सर ( Gopal Gavit ), जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना 
मो.नं. 9527722072
गोपाल गावित सर








नंदुरबार- विघटीत समाजाला एकत्रित करण्यासाठी भारतीय संविधान सन्मान सुरक्षा व संवर्धन हे अभियान आहे. हे अभियान देशातल्या १५० जिल्ह्यांमध्ये सद्या आपण राबवित आहोत. टप्प्याटप्प्याने हे अभियान आपण देशभरात नेणार आहोत. जनता संविधान साक्षर व्हावी, हा या अभियानामागील प्रमुख उद्देश आहे, ज्यांना आपल्या संविधानिक अधिकारांची जाणीव नाही, त्यांच्याशी हितगुज करुन त्यांना आपल्या अधिकारांच्याबाबतीत जागरुक करण्याची ही प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन बामसेफचे राष्ट्रीय संघटन सचिव संजय मोहिते यांनी केले. ते येथील बामसेफ आयोजित बीएस-४ अभियानांतर्गत भारतीय संविधान कार्यान्वयन चेतना व मुलनिवासी बहुजन एकता रॅली समारोपाप्रसंगी बोलत होते.



बीएस-४ अर्थात भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा व संवर्धन या राष्ट्रव्यापी जनजागरण अभियान अंतर्गत बामसेफ व सहयोगी सामाजिक संघटनांमार्फत भारतीय संविधान कार्यान्वयन चेतना व मुलनिवासी बहुजन एकता रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते. चेतना रॅलीची सुरुवात साक्री नाका येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन झाली. व रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह परिसरात झाला.



समारोपाप्रसंगी प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रबोधन सभेत शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील, मुलनिवासी संघाचे पावबा ठाकरे, मुलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमकांत मोरे, संविधान प्रबोधक रविंद्र मोरे, बामसेफ नंदुरबार जिल्हा प्रभारी डॉ. दिलीप लोखंडे हे प्रमुख वक्ते उपस्थित होते. 



यावेळी पुढे संजय मोहिते म्हणाले की, बीएस-४ अभियानांतर्गत भारतीय संविधान कार्यान्वयन चेतना व मुलनिवासी बहुजन एकता रॅली आयोजित करण्याचा एक निश्‍चित उद्देश आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील जनतेला एकतेचा संदेश आपण देवू इच्छितो. देशातील नागरीक आपल्या समस्या सोडविण्यासाठी दाद मागत आहेत. ती दाद कशी मागावी, याचे मार्गदर्शन बीएस-४ अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना करावयाचे आहे. त्यासाठी आपण संविधान प्रबोधक नियुक्त करुन सामाजिक लोककार्यवाही करण्याचे योजिले आहे. यानंतर नरेंद्र पाटील म्हणाले की, संविधानाचे मौलिक अधिकार आडमार्गाने काढले जात आहेत. 



पावबा ठाकरे म्हणाले, संविधान ग्रामीण भागातील जनतेस समजावून सांगणे गरजेचे आहे. हेमकांत मोरे म्हणाले, आपले संविधान हस्तलिखित असून त्यात बर्‍याच चित्रांचा समावेश आहे. त्या चित्रांच्या माध्यमातून संविधानात संदेश देण्याचा प्रयत्न झालेला आहे. तो संदेश आपण समजून घ्यावा. रविंद्र मोरे म्हणाले, या देशातील शंभर टक्के महिलांना अधिकार देऊन सुरक्षित केले आहे. व संविधानाच्या माध्यमातूनच महिला देशात वेगवेगळ्या पदांवर विराजमान झाल्या व कार्यरत आहेत. 




कार्यक्रमाची प्रस्तावना बामसेफचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी मांडले. सूत्रसंचालन बामसेफचे महासचिव ललिता शिरसाठ तर आभार बामसेफचे राज्य उपाध्यक्ष प्रविण खरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविशंकर सामुद्रे, गोरखनाथ बिरारे, नंदू बैसाणे, गौतम भामरे, बी.एस.पवार, परमेश्‍वर मोरे, डी.आर.पवार, संतोष नागमल, अशोक पवार, विद्या मोरे, यश भामरे, मेघा जाधव, प्रियंका सामुद्रे, शशिप्रभा थोरात, अस्मिता मोहिते, ज्योती मोरे, मालती मोहिते, विशाल चहांदे, हिमांशु बोरसे, रमेश बिरारे आदींनी केले. रॅलीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

Post a Comment

0 Comments

झाले